Pages

Saturday, June 11, 2011

टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती


ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात टिटवाळा नावाचे एक छोटे शहर वजा एक खेडे आहे. एक प्राचीन आणि पुरातन असे सिद्धिविनायक महागणपतीचे मंदिर आहे. ह्या गणपतीला विवाह गणपती असेही म्हणतात. १२ ते १३ एकर वर पसरलेले हे मंदिर कालू नदीच्या तीरावरच वसलेले आहे. ह्या मंदिराचा उल्लेख हजारो वर्षापूर्वीच्या ग्रंथात आणि साहित्यातही सापडतो. मधल्या काळात ह्या स्थळाचे वर्णन कुठेच आढळत नाही थेट माधवराव पेशवांच्या काळात ह्या मंदिराचा उल्लेख येतो.
टिटवाळयाचा सिद्धिविनायक महागणपती 

प्राचीन साहित्यांच्या आधारे हे शहर त्यावेळेला दंडकारण्यात येत होते. (दंडकारण्याचा परिसर काही साहित्याप्रमाणे आत्ताचा पूर्ण (?) महाराष्ट्र (कदाचित कोंकण सोडून) आणि मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, आत्ताचे छत्तीसगड, बिहार ह्या राज्याचा काही भाग. आता बहुतांशी भाग हा नक्षलवादींच्या हाताखाली आहे.) कण्व ऋषी ह्या परिसरात आश्रम बांधून राहत होते. कण्व ऋषीं ऋग्वेद आणि अंगिरस ह्या वेदांचे लेखक मानले जातात. ह्या ऋषींनी शकुंतला नामक मुलीला तिच्या आई वडिलांनी त्याग केल्यावर दत्तक घेतली होती. शकुंतला हि ज्येष्ट ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका ह्यांच्या संबधातून जन्माला आलेली होती. तिच्या जन्मानंतर तिच्या आई वडिलांनी तिच्या त्याग केल्यावर कण्व ऋषींनी तिला दत्तक घेऊन तिचा सांभाळ केला. 

एकदा गांधार देशाचा राजा दुष्यंत लढाईच्या मार्गावर असताना ह्या परिसराच्या बाजूने जात होता. त्यावेळेला त्याने सुंदर शकुंतलेला पहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला. तीच गोष्ट शकुंतलेच्या बाबतीत ही घडली. पुढे त्या दोघानी गंधर्व पद्धतीने विवाह केला. काही काळ एकत्र व्यतीत केल्यावर राजा दुष्यंताला आपल्या राज्यात परतावे लागले. जाताना त्याने आठवण म्हणून आपली राजेशाही खानदानी अंगठी तिला दिली आणि त्याने परत येऊन तिला घेऊन जाण्याचे वचन देऊन तो निघून गेला. काही काळाने एकदा आश्रमात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी अत्यंत तापट स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. शकुंतला दुष्यंताच्या विचारात मग्न असल्यामुळे तिने त्यांचे यथायोग्य स्वागत केले नाही म्हणून त्यांनी रागाने तिला शाप दिला कि तू ज्या आवडत्या व्यक्तीच्या विचारात राहून माझे स्वागत केले नाहीस तोच व्यक्ती तुला तुझ्या आठवणींसकट विसरून जाईल. शकुंतलेने माफी मागितल्यावर त्यांनी दया येऊन तिला उ:शाप हि दिला कि त्याने दिलेले प्रेमाचे प्रतिक त्याला दाखवल्यावर त्याला सर्व आठवेल.
दुष्यंत शकुंतला राजा रवी वर्म्याच्या नजरेतून

दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापानुसार सर्व घडत गेले. राजा दुष्यंताने शकुंतलेला ओळखले नाही व तिचा स्वीकार हि केला नाही. कण्व ऋषींनी शकुंतलेची दशा पाहून तिला विघ्नहर्त्या सिद्धिविनायक गणेशाची स्थापना करून पूजा करायला सांगितली. सिद्धिविनायकची भक्ती केल्यानंतर तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि राजा दुष्यंत तिचा स्वीकार करेल. कण्व ऋषींनी सांगितल्याप्रमाणे तिने सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले आणि गणेशाची भक्ती केली. नंतर काळानुसार दुष्यंताने तिचा स्वीकार केला. दुष्यान्तापासून तिला मुलगा हि झाला. त्याचे नाव भारत ठेवले गेले. महाभारतातील कौरव पांडव हे ह्या भारत राजाचेच वंशज होते. 

पुढे काळाच्या ओघात ते मंदिर पाण्याखाली गेले असावे. कारण मधल्या कुठल्याच काळात त्याचे अस्तित्व सापडत नाही. पेशवांच्या काळात एकदा दुष्काळ पडला असताना त्या दुष्काळावर मात करण्यासाठी पेशव्याचे सरदार रामचंद्र मेहेंदळे ह्यांनी तलावाचे उत्खनन करायला चालू केले असता त्यांना मंदिराचे अवशेष सापडले. पुढे स्वप्नातील दृष्टांतानुसार त्यांना पुढे गणेशाची मूर्ती सापडली. पेशव्यांनी लगेचच मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. पुढे वसईची स्वारी जिंकून आल्यानंतर त्यांनी गणेशाच्या मूर्तीची प्रतिस्थापना केली.१९६५-६६ सालापर्यंत पेशव्यांनी बांधलेल्या मंदिराची पडझड झाली होती. लाकडाचे बांधकाम असलेल्या सभामंड हि छोटा पडू लागला होता. म्हणून १९६५-६६ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला 

पेशव्यांनी ३ एकर जागा देऊन हे मंदिर बांधले होते. नंतर मंदिराचे पारंपारिक पुजारी जोशी ह्यांनी आपल्याकडची १३  एकर जागा देऊन ह्या मंदिराचा विस्तार केला. नुकतेच महापालिकेने तलावाचे बांधकाम करून सारा परिसर सुशोभित केला. 

ह्या गणेशाला विवाह गणपती सुद्धा म्हणतात.विवाह न होणाऱ्यांसाठी आणि विवाह इच्छुक जोडप्यांनी ह्या गणेशाची आराधना केल्यावर त्यांच्या मनासारखा विवाह घडून येतो. तसेच घटस्फोटीत जोडपे हि आपले वाद मिटवण्यासाठी ह्या गणपतीचे दर्शन घेतात. गणपतीची मूर्ती हि हि ३.५ ते ४ फुट उंचीचा ओटा बांधून त्यावर विराजमान झालेली आहे. त्यामुळे सभा मंडपात बसून हि देवाचे चांगले दर्शन होते. सभामंडपाच्या वर असलेल्या गॅलेरी मधून सभामंडपाचे आणि गणेशाच्या मूर्तीचे दर्शन होते. 

सुरक्षेच्या कारणास्तव आता ह्या मूर्तीचे फोटो काढता येत नाही. वर लावलेला मूर्तीचा फोटो हा नेट वरून घेतलेला आहे. ह्या मंदिरात जायला मध्य रेल्वेवरच्या टिटवाळा स्टेशन वर उतरावे लागते. तेथून टांग्याने किंवा ऑटो करून ५ मिनिटात मंदिरात जाता येते. सकाळी लवकर गेल्यास ऑटो न करता आजूबाजूचा निसर्ग पाहत रमत गमत चालत जायचे. चालत २५ ते ३० मिनिटात मंदिरात पोहोचता येते. मंदिरात दर्शन करून अर्धा तास बसायचे आणि मग आरामात परतीला लागायचे.


टिटवाळा गणपती मंदिर


Read rest of entry

Tuesday, May 17, 2011

अलिबागचे जुने वाडे

अलिबाग दरवेळेपेक्षा ह्या वेळेला मला खूप वेगळा वाटला आणि आवडला सुद्धा ते म्हणजे तेथील जुने वाडे आणि देवळांसाठी. ह्या पोस्ट मध्ये फक्त जुन्या वाड्यांचे फोटो टाकत आहे. खरच नशीबवान आहेत ह्या वाड्यात राहणारी माणसे जी अजून ही आपली संस्कृती आणि पारंपारिक निवासस्थाने जपून आहेत. मला अश्या ह्या लाकडांच्या वाड्यांचे, त्यांच्या भग्न अवशेषांचे लहानपणापासून आकर्षण आहे. 

























Read rest of entry

Sunday, May 8, 2011

जंजिरा अजिंक्य कसा राहिला असावा?


किल्ल्याचे भौगोलिक परिस्थिती आणि रचना पाहता किल्ल्याला वेढा देऊन एक ते दोन वर्षात किल्ला सहज जिंकता येणारा असावा पण तरी सुद्धा हा किल्ला इतिहासात अजिंक्य राहिला. ह्याची कारणे शोधायचा थोडा प्रयत्न केला.

जंजिरा किल्ला अजून पर्यंत अजिंक्य कसा राहिला?
माझ्या अंदाजाप्रमाणे खालील कारणे असू शकतात.
१.  हबशी लोक जे मूळ आफ्रिकन वंशाचे होती ते जेवढे क्रूर होते तेवढेच शूर हि होते.
२. किल्ल्यावर गोड्या पाण्याचा चांगला साठा होता जो भर उन्हाळ्यात हि भरलेला असायचा जेणेकरून किल्ल्याला वेढा पडला तरी त्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासायची नाही.
३. किल्ल्यात खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था होती. गोदामात २ वर्षे पुरतील एवढे धान्य भरलेले असायचे. त्यामुळे वेढ्यात उपासमार होत नव्हती.
४. सिद्दींनी काळानुसार आदिलशाहीनिजामशाहीमुघल ह्यांच्या बरोबर संधी केलेली होती. ज्याचे राज्य आणि पॉवर जास्त त्या राज्याबरोबर त्यांनी त्या त्या वेळेला संधी केलेली होती.
५. हि लोकं किल्ल्याला वेढा पडला असता मागून हल्ला करून शत्रूचे लक्ष विचलित करत असावे आणि वेढ्या दरम्यान त्यांना रसद पुरवठा करत असावे.
६. किल्ल्याचे उत्कृष्ट आणि मजबूत बांधकाम ह्या किल्ल्याचा दरारा टिकवून होते. मराठी फौजेचाइंग्रजी आणि पोर्तुगीज आरमाराचा आणि त्यांच्या तोफेचा ह्या किल्ल्याच्या बुरुजांनी यशस्वी रित्या सामना केला.
७. किल्ल्याची बांधणी अश्या प्रकारे केली होती कि बाहेरून शत्रूला किल्ल्यात काय चालले आहे  वा किल्ल्याच्या आतील रचना कशी आहे ते कधीच समजू शकले नाही. त्यामुळे शत्रूला चांगली योजना आखता आली नसावी.
८. किल्ल्यामधून असलेला भुयारी मार्ग जो किनाऱ्याला जाऊन मिळत होता. कदाचित ह्या गुप्त रस्त्याद्वारे हेरगिरीइतर मुसलमान राजांना निरोप पोहचवणेरसद पोचवणे शक्य असावे.
८. किल्ल्यावर असलेल्या अतिजड आणि लांब पल्ल्याच्या तोफा. 'चावरी', 'लांडा कासमआणि सर्वात मोठी अशी कलाल बांगडी' ह्या सारख्या तोफांनी शत्रूची नजरेत येणारी कितीतरी जहाजे उध्वस्त केली असावी. त्यामुळे शत्रूला कधीच जवळ येत आले नाही.
९.सिद्धीचे प्रबळ आरमार हे एक महत्वाचे कारण असू शकेल.  किल्ल्याला चांगल्या लढाऊ आणि मजबूत जहाजांचा नेहमी वेढा असावा जेणेकरून किल्ल्यावर समोरून कधीच चढाई करता आली नसावी.
१०. आज पर्यंतच्या इतिहासात बघितले असेल तर मोठमोठाली राज्ये आणि मजबूत किल्ले हे फक्त फितुरी मुळे पडली आहेत. अनेक महाराष्ट्रातील किल्लेरायगडदेवगिरीचा किल्लाटिपू सुलतानाचा मैसूरचा किल्ला, विजयनगरीचे साम्राज्य वगैरे मोठे राज्ये फितुरी मुळेच पडली आहेत. फितुरी करणारे गद्दार आत मधून किल्ल्याचे दरवाजे उघडून द्यायचे अथवा किल्ल्याच्या चोर वाटांची माहिती द्यायचे. सिद्दीच्या नशिबाने त्याला तसे फितुरी करणारे गद्दार मिळाले नव्हते. त्यामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला असावा.
११. राजे संभाजी ने जेव्हा ह्या किल्ल्याला वेढा दिला होता तेव्हा त्याने काही काळ लढाई थांबवली होती कारण मोठ्या मेहनतीने आणि कौशल्याने आपला एक माणूस किल्ल्यात घुसवला होता. ह्या माणसावर किल्ल्यातील दारूगोळ्याचा साठा शोधून त्याला उडवायची कामगिरी दिली होती पण सिद्धीच्या एका दासीला संशय आल्याने त्याची चौकशी केली गेली आणि तो पकडला गेला. त्याच वेळेला मुघलांनी मागून मराठी राज्यावर हल्ला करायला सुरुवात केली आणि त्यामुळे संभाजीला हा वेढा उचलून परतावे लागले. बहुतेक शिवरायांना सुद्धा ह्याच कारणामुळे किल्ला जिंकता आला नसावा. शिवरायांनी ह्याच किल्ल्याच्या वायव्येस पद्मदुर्ग उभारला. संभाजीने ह्या किल्ल्याला शह देण्यासाठी मग तेथून जवळच्या बेटावरच कासा किल्ला बांधला. आता त्या किल्ल्यावर जायला पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागते. 
१२. सिद्दीला तेथील स्थानिक लोकांचे सहाय्य मिळत असावे जेणेकरून त्याच्या विरुद्ध कधी बंड किंवा फितुरी झाली नाही.


वरील काही कारणे असू शकतात ज्यामुळे जंजिरा कधी पडला नसावा. 
बाकी काहीही असो ह्या किल्ल्याने डोळ्याचे पारणे फेडले. असा मजबूत, देखणा किल्ला वर्षोन वर्षे उन पाऊस, समुद्राच्या लाटा, खाऱ्या वाऱ्याचा सामना करत आपले पाय घटत रोवून  आपल्या महाराष्ट्रात उभा आहे हेच अभिमानाची गोष्ट आहे. 


खाली काही किल्ल्यावर काढलेले मोजके फोटो दिलेले आहेत. साडे तीनशे फोटो मधून मोजकेच फोटो निवडणे किती कष्टाचे काम असते?


बोटीत कोंबलेली माणसे



भरभक्कम बुरुज 

भर भक्कम बुरुज

सिद्दीचा राजवाडा





सिद्दीचा राजवाडा. येथून आत जायला बंदी आहे.



किनाऱ्यावर असलेला सिद्दीचा राजवाडा.


त्यावेळेची मुख्य मशीद पण आता बंद असते. फक्त ईद च्या दिवशी प्रवेश असतो



भग्न झालेल्या भिंती, येणारे पर्यटक पडू नये म्हणून नव्याने बांधलेले कठडे.
दोन्ही बांधकामामध्ये किती तफावत आहे ते पहा 



गोड्या पाण्याचे तलाव



टेकडीवरून दिसणारा गोड्या पानाचा तलाव

हे बहुधा धान्याचे कोठार अथवा दारू गोळ्याचे कोठार असावे. थोड्या वरच्या बाजूला बांधलेले आहे.

दुरवर समुद्रात असणारा हा सुळका. कसा काय तिथे निर्माण झाला असेल काय माहिती ?



टेकडी वरून दिसणारा किल्ला आणि समुद्र, खाली सफेद रंगात असलेली मशीद

हे काय होते ते समजले नाही बहुतेक ही भिंत नंतर टाकून हे बंद केले असावे.



बुरुज बांधताना चौकोनी दगडांना असे होल पडायचे. वरच्या दगडाचा बाहेर आलेला खुंटा ह्या दगडात बरोबर
 बसायचा त्यामुळे  बुरुजाच्या भिंती एकमेकांत अडकून मजबूत राहिल्या (इंटर्लोकिंग पद्धती प्रमाणे)

बरुजावरून एकदम खाली


बरुजावरून एका कोनातून दिसणारा महाल

सागाचे दरवाजे खिडक्या काढून नेल्यामुळे किल्ल्यावरील घरांची अशी हलत झाली.

किल्ल्यावरील झरोक्यातून दिसणाऱ्या बोटी. शत्रू पण असाच दिसत असावा. 


भरलेल्या होडीला एका बांबूने फक्त दिशा देतात.
Read rest of entry

Monday, May 2, 2011

अलिबागचा किनारा

मागच्या एप्रिल महिन्यात शनिवार रविवार जोडून आले होते. खूप दिवस मित्रांचे प्लानिंग चालू होते. विकेंड साठी कुठे तरी जायचे. दोन दिवसात फिरता येण्यासारखे कोणते स्पॉट आहेत ते शोधणे चालू होते. सिल्वासा, जव्हार, तिथल, माथेरान, अलिबाग, मुरुड जंजिरा सारखे अनेक पर्यायांवर मेलबाजी चालू होती. फायनली मुरुड जंजिरा ठरत आले. असे तसे बीच वर जाऊन फिरण्यापेक्षा एक ऐतिहासिक स्पॉट करावा असे ठरले. जंजिराचा किल्याबाबत खूप ऐकून होतो. तो अजून बघायला मिळाला नव्हता. त्यामुळे तोच फायनल केला. दरवेळेसारखे उडाणटप्पू सारखे ठरले कि उचला बॅगा आणि चला फिरायला असे नव्हते. आता लग्न झालेले होते आणि प्रत्येकाच्या बायका सोबत येणार होत्या त्यामुळे रहायचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत निघता येणार नव्हते. अगदी शेवटच्या दिवशीपर्यंत रहायचा बंदोबस्त होत नव्हता.

पिकनिक जवळपास रद्द झाल्यामध्येच जमा होती. नेट वरून सगळे हॉटेल शोधून झाले. मित्रांचे, त्यांच्या मित्रांचे  बंगले शोधून झाले पण काहीच रिकामे नव्हते. मोठा विकेंड आल्यामुळे सर्वच  बाहेर पडले होते. त्यामुळे सर्व हॉटेल बुकिंग आधीच फुल झाली होती. मुरुड मध्ये जागा नव्हती, काशीद चे सर्व हॉटेल्स बुक्ड होते, अलिबाग पण फुल्ल होते. 

अगदी शेवटच्या क्षणाला ऑफिस मधून निघताना एका हॉटेल मीरा माधव -अलिबाग- ची साईट भेटली. तिथे फोन करून विचारले तर तिने सांगितले रुम्स उपलब्ध आहेत. तीन कपल असल्यामुळे तीन रूमची गरज होती. तिथे भेटल्या, रूमचे भाडे पण रीजनेबल होते. लगेच बुकिंग करून टाकली सगळी फोनाफोनी परत चालू झाली सर्वाना तयार व्हायला सांगितले. आता गाडीची अडचण होती ती पण मिळाली. बुक करून टाकली. 

दुसऱ्या दिवशी उन्ह लागायच्या आधी आणि ट्राफिक जमा व्हायच्या आधी निघायचे ठरवले. सकाळी सहा चे प्लानिंग ठरले. पण निघायच्या आधीच गाडीचा टायर पंक्चर झाला. दोन तास गेले. सकाळी आठ वाजेपर्यंत ठाण्यातच होतो. शेवटी साडे आठला ठाणे बेलापूर रोड ला लागलो. भूक लागली होती नाश्ता करायचा होता.  हॉटेल कर्नाळा आठवले. मागे कर्नाळा ट्रेक ला गेलो होतो तेव्हा तिथे भरपेट नाश्ता केला होता. तेथला नाश्ता परत करायची इच्छा झाली. तसे अलिबागला पण तेथूनच जायचे होते. मग गाडी त्याच रोड ला काढायला सांगितली. 


स्पेशल थाळी
हॉटेल कर्नाळा मध्ये मिसळ पाव, वडा सांबर, कोकम सरबत, वडा उसळ वर चांगला ताव मारला आणि तेथून पुढच्या प्रवासाला निघालो. पनवेलला वडखळ नाक्याला थोडे ट्राफिक जमा होत होते पण निसटलो आणि सरळ अलिबाग रोडला लागलो.

दुपार पर्यंत अलिबाग ला पोहचलो. हॉटेल मीरा माधव मध्ये चेक इन केले. फ्रेश झालो. हॉटेल जसे फोटो मध्ये बघितले होते तसे नव्हते. खूप अस्वच्छ होते. टॉयलेट , बाथरूम तर खूप अस्वच्छ होते. रूम मधली लादी पण कित्येक दिवस पुसली असेल असे वाटत नव्हते. फक्त बेड चांगला होता आणि एसी चालू कंडीशन मध्ये असल्यामुळे एसी ची हवा चांगली होती. त्यामुळे त्या रूम मध्ये राहवले. (हॉटेल ला पाच पैकी दोन मार्क्स)

फ्रेश होऊन बाहेर पडलो आधी भरपेट जेवण केले . मग किल्ल्यावर जायचे ठरवले पण उशीर झाला होता विचार केला कि बोटी सहा नंतर बंद होतात मग खूप घाई होईल. म्हणून किल्ल्यावर दुसऱ्या दिवशी जायचे ठरले. मग जवळपासचे स्पॉट करून यायचे ठरले. जेवण झाल्यावर बिर्ला मंदिर ला जायचे ठरले.


बिर्ला मंदिराचे प्रवेशद्वार

अलिबाग वरून रोहा रोड ला जाताना मध्ये बिर्ला मंदिर लागते. तेथे गेलो तर मंदिर अजून उघडले नव्हते. चार वाजता उघडणार होते. बाहेरून देवांचे दर्शन घेतले. साडे चार पर्यंत वाट बघितली पण मंदिर काही उघडले नाही. मग तेथून परत निघालो. फोटोग्राफी करायला परमिशन नव्हती त्यामुळे एवढ्या चांगल्या मंदिराचे फोटोच नाही काढता आले.


तिथून परतीच्या प्रवासाला लागलो. संध्याकाळ होत आली होती विचार केला सूर्यास्त बीच वर जाऊन बघायचा. बिर्ला मंदिराकडून अलिबाग रस्त्याला जाताना नागांव बीच लागते. अलिबाग बीच पेक्षा हे बीच जरा स्वच्छ आहे.येथे बोट रायडिंग वगैरे पर्याय पण उपलब्ध आहेत. इथे बीच वर असलेल्या छोट्या टपरीवर चहा प्यायलो. एका ठिकाणी जास्त गर्दी दिसली म्हणून बघायला गेलो तर तेथे बैलगाड्यांची शर्यत लागली होती. नंतर समजले कि शर्यत बुधवारी होणार होती त्याचा सराव चालू होता. पण त्यामध्ये बैलांची खूप हालत होत होती. बैलांना चाबूक मारून पळवत होते आणी थांबवायच्या वेळेला अगदी वेसन जोरात खेचून थांबवत होते. त्यामुळे बैलांच्या नाकातून पण रक्त येत होते. तेथे शुटींग केली आणि बीच वर निघालो. (हा विडीओ सर्वात शेवटी लावला आहे)




नारळांची आरास
बैलगाडी 
बैलगाडीची शर्यतीचा सराव
पाण्याला चांगला जोर होता. बीच वर धम्माल केली आणि परत हॉटेल वर आलो. अलिबाग ला तसा तीन चार वेळेला जाऊन आलो होतो. पण मला अलिबाग कधी चांगला नाही वाटला. कदाचित फक्त बीच वर जाऊनच परत यायचो आणि आतमध्ये कधी फिरलो नव्हतो म्हणून वाटले असेल. पण ह्या वेळेला कदाचित जास्त आत मध्ये फिरलो आणि बघण्याचा नजरिया बदलला होता. त्यामुळे अलिबाग ह्या वेळेला खूप आवडले. खासकरून तेथे असलेले जुने आणि वापरात असलेले मोठे मोठे वाडे आवडले. मला अश्या सागाच्या लाकडात बनवलेले वाडे खूप आवडतात. काही वाडे पडीक झाले होते तर काही अजूनही वापरात असल्यामुळे चांगल्या स्थितीत होते. त्याकाळी ह्या वाड्यांनी चांगले दिवस बघितले असतील. चांगले ऐश्वर्यात राहिले असतील. आता वापर नसल्यामुळे वाळवी लागून बहुतांशी वाड्यांची पडझड झाली होती.

माझ्या छोट्या कॅमेरातून चंद्राचा फोटो काढायचा केलेला प्रयत्न
आम्ही दोघे

ह्या वेळेला अलिबाग आवडला ते अजून एका कारणासाठी ते म्हणजे तिथे असलेल्या मंदिरांसाठी. अगदी स्वातंत्रपुर्व काळातील मंदिरापासून ते आता काही वर्षापूर्वी बांधलेल्या मंदिरांपर्यंत. खूप छान छान मंदिर आहेत. काही मंदिरांची बाहेरून पडझड झाली आहेत. पण आत अजून ही पूजा होत असते. अगदी अर्ध्या किलोमीटरवर एक मंदिर असेल. एवढी मंदिर तेथे आहेत. सगळ्या मंदिरात जाणे जमणार नव्हते पण बाहेरून जाताना जेवढी चांगली वाटली तेवद्यांचे फोटो काढले तर काही मंदिरांचे आत जाऊन दर्शन घेतले. पुढच्या वेळेला नक्की अलिबाग ला जाईन ते फक्त तेथील जुने वाडे बघण्यासाठी आणि सर्व मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी. (अलीबागचे वाडे आणि मंदिरांचे फोटो वेगळ्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे)

रात्री अलिबाग बस स्टँड समोरच असलेल्या हॉटेल फुलोरा मध्ये जेवलो. एका कोंबडीला आणि दोन सुरमई माशांना ढगात पाठवले आणि सर्व पोटभर जेवलो. रात्री एक अलिबाग बाजारपेठेत राउंड मारला आणि गप् जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच उठून फिरायला जायचे ठरवले होते.
चिकन लोलीपोप

बटर चिकन

सुरमई फ्राय

दुसऱ्या दिवशी सहाला नाही पण सात पर्यंत तरी रुमवरून बाहेर पडलो. अलिबागचा बीच हॉटेल पासून जवळच होता. चालत चालत गप्पा मारत बीच वर पोहोचलो. सकाळ असल्याने गर्दी कमी होती. तरी काही उत्साही ग्रुप पाण्यात दिसत होते. भरतीची वेळ असल्याने किनाऱ्यावर एक पोलीस उभा राहून सर्वांकडे लक्ष ठेवून होता. समोरच कुलाबा किल्ला होता. पण वेळ कमी असल्यामुळे तेथे जाता आले नाही. सगळ टेन्शन विसरून शांतपाने अर्धा तास बसून राहिलो.

नाश्ता करून साडे दहा पर्यंत अलिबाग सोडले आणि मुरुडला निघालो. वाटेत एक दोन मंदिरांचे दर्शन घेत दुपारी अडीच पर्यंत जंजिरा किनाऱ्याला पोहोचलो. अजिंक्य असा जंजिरा पाहून डोळ्याचे पारणेच फिटले. त्या किल्ल्याचे वर्णन करायला एक अख्खा ब्लॉगच लिहावा लागेल.
अलिबागचा किनारा

आवळ्याचे झाड



वळू

कच्च्या कैऱ्या

डोंगरे हॉल

नगरपरिषद

नगरपरिषदेवर असलेला टिळकांचा पुतळा

इंग्रज कालीन इमारती

अलिबाग चा किनारा 

कुलाबा किल्ला 

कुलाबा किल्ला







रेवदंडा खाडीतून दिसणारा कोरलाई किल्ला

बैलांच्या शर्यतीचा सराव



पुढील पोस्ट मध्ये जंजिरा किल्ल्याचे फोटो नक्की पहा. लवकरच टाकेन 










Read rest of entry
 

About Me

My Photo
Ashish Sawant
View my complete profile

Followers

My Blog List

मी इथेही....

Marathi Mandali! Marathi IndiBlogger - The Largest Indian Blogger Community Visit blogadda.com to discover Indian blogs