Pages

Thursday, February 19, 2015

ठाणे वज़्रेश्वरी ठाणे- बुलेट सफारी.

ठाणे वज़्रेश्वरी ठाणे
बुलेट घेतल्यापसून कुठे तरी बाहेर पिकनिक ला जायचा खूप विचार चालू होता. पण तशी संधी आणि वेळ मिळत नव्हता. शेवटी 25/26 जानेवारी ची सुट्टी लागून आली त्यामुळे जवळ कुठे तरी फिरून यायाचा प्लान ठरत होता. ठाण्यापासून जवळ असलेली सगळी ठिकाणे बघून झाली होती. त्यामुळे कुठे जायचा हा प्रश्न होता. अशातच वज्रेश्वरी चे नाव समोर आले.  खूप लहान असताना म्हणजे 20 वर्षेपूर्वी वज्रेश्वरीला गेलो होतो. त्याच्या धूसर आठवणी डोळ्यासमोर होत्या. ठाण्यापासून घोडबंदर मार्गे वसई विरार करत गेलो तर गूगल मॅप प्रमाणे ते अंतर 62 किमी होते. आणि भिवंडी मार्गे अंदाजे 45 किमी होते. विचारांती असे ठरले की जाताना घोडबंदर मार्गे जायचे.

मेदुवडा सांबर 
सकाली 7.15 निघलो.. बुलेट दोन दिवसपूर्वीच सर्विस करून आणली होती त्यामुळे तो आपल्याच खुशीत चमकत होती. एकाच किक मध्ये स्टार्ट होऊन तिने आपली पसंती दर्शवली. सातशे रुपयाचे पेट्रोल घालून तिचे पोट भरून घेतले. मग तर ती अजून खुश झाली. घरातून निघताना किलोमीटर ची नोंद करून ठेवली होती....2292 किमी दाख

वत होते. सुजीतला पिक अप करून पुढे मानपाड़ा नाक्यावर जिगरला भेटलों. दोघे पण स्वेटर/जैकेट घालून आले होते. आणि मी दीड शहण्यासारखे हाल्फ़ पेक्षा पण हाल्फ़ स्लिम फिटिंग चे शर्ट घटले होते. आधी थंड हवा चांगली वाटली पण जसे शहर संपुन घोडबंदर चे जंगल चालू झाले तशी थंडीची लहर अंगातून घुसून अंगभर नाचायला लागली. मध्ये मध्ये कोवळे उन अंगावर पडले की बरे वाटत होते. घोडबंदर संपुन पुढे अहमदाबाद हायवेला लागलो. आजूबाजूचे निसर्ग बघत हॉटेल शोधायला चालू केले. नाश्ता आणि चहाची खूप गरज होती. बहुतांशी हॉटेल आणि ढाबे अजून उघडले नव्हते. एक सव्वा तासाचे रनिंग झाल्यावर एक बरयापैकी गर्दी असलेले हॉटेल दिसले. आम्ही सहसा गर्दी वालेच हॉटेल बघतों कारण तिथे ताजे अन्न मिळते. अपेक्षेप्रमाणे नाश्ता चांगला होता. मिसळ पाव, इडली वडा सांबर आणि मैसूर डोसा खाऊन एक स्पेशल चाय पिउन पोटाच्या टाक्या फूल केल्या. पण नेमके हॉटेल चा फोटो काढायला विसरलों. हॉटेल चे नाव अन्नपूर्णा- व्हेज हॉटेल.
मिसळ पाव

वज्रेश्वरी ला जायचा रस्ता
गूगल मॅप चेक केले आणि किती अंतर बाकी आहे ते बाघितले...अजून खूप पल्ला गाठायचा होता. स्पीड वाढवायचे ठरवले. पुढे गाड्या सुस्साट पळवल्या. बरेच अंतर मागे टाकल्यावर तुंगारेश्वर फाटया जवळ उजवी कडे वळून वज्रेश्वरीचा रस्ता पकड़ला. विना द्विभाजक असलेला ह्या रोड वर गाड़ी टाकताच शहरी हवा संपुन गावची शुद्ध थंडगार हवा अंगाला जाणवू लागली. ह्या रस्त्यावर बुलेट पळवायला जी मजा आली ती हायवे वर येत नाही. बुलेट सफारीचा खरा आनंद ह्या रस्त्यावर भेटला.  ह्या रस्त्याला समांतरच तानसा नदी वाहत असते त्यामुळे हवेत थंडपणा आणि वेगळाच ताजेपणा होता. मुख्य हाइवे पासून अंदाजे 14 किमी अंतर कापल्यावर गणेशपुरीला जायचा रास्ता येतो. तिथे सिद्धपीठचे दर्शन घेऊन पुढे नित्यानन्द महाराजांच्या समाधि जवळ गेलो. शिवलिंगचे दर्शन घेऊन पाण्याचे गरम कुंड बघायला गेलो. तिथे असलेली गर्दी पाहून काढता पाय घेतला. परत 2 किमी मागे येऊन वज्रेश्वरी मंदिरचा रस्ता पकड़ला. मंदिरासमोर असलेल्या छोट्या रस्त्यावर आधीच ट्राफीक जमले होते. एका हार वाल्याच्या दुकानात गाड्या पार्क करून मंदिरात गेलो. दर्शनसाठी ही भली मोठी रांग होती. देवालयाला बाहेरुन प्रदिक्षिणा घातली मंदिरच्या मागे झाड़ाखली निवांत बसलों. 

वज्रेश्वरी ला जायचा रस्ता

नित्यानंद स्वामीचा मठ

नित्यानंद स्वामीचा मठ


श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान

श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिराच्या पायऱ्या 

पूजा सामानाचे दुकान 

शिवलिंग

वज्रेश्वरी देवीची मंदिर 

वज्रेश्वरी देवीचे मंदिर. 

शिवलिंग 

शिवलिंग 

शिव 

जय हनुमान

शिवलिंग 

वज्रेश्वरी मंदिराच्या पायऱ्यावरून 
निघताना मंदिराच्या बाहेरच एक पड़का वाडा होता. कधी काळी त्या वाडयाने नक्कीच वैभव पहिले असणार आज तो पडिक होऊन जीर्ण अवस्थेत उभा असला तरी त्याच्या अंगाखांद्यावर गतवैभवाच्या खाणाखुणा दिसत होत्या. तो पडिक वाड़ा पाहून उगाचच नोस्टाल्जिक झाल्या सारखे वाटले. पुढे मागे जर स्वत:चे मोठे घर कधी बनवायाला भेटले तर नक्कीच असे घर बनवेन. 

पडका वाडा 
बाजारातून लाल टप्पोरी बोरे घेतली. उसाचा रस प्यायलों आणि परतीचा रस्ता धरला. जाताना तुंगारेश्वर जंगलातून निघून भिवंडी रोड मार्गे परतायचे ठरले. देपिवली गावात मित्राचा एक प्लॉट होता तिथे एक ब्रेक घेऊन ठाण्याच्या रस्त्याला लागलो. रस्त्याची हालत अगदीचं बेकार होती. गाड़ी 30 च्या वरती पळवता येत नव्हती. एक तास गाड़ी पळवल्यानंतर एका वळणावर  एक मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत विसावलो. पाणी ढोसून फ्रेश झालो. थोड़े फोटो सेशन केले आणि पुढच्या प्रवासाला लागलो.  हा रोड तुमचे 15 ते 20 किमी चे रनिंग वचावतों. पण रस्ता खराब असल्याकारणामुळे कमीत कमी पाउण तास जास्त लागतो. जस जसे तुंगारेश्वर नॅशनल पार्क मधून बाहेर येतो तस तसे भिवंडी चा औद्योगिक एरिया चालू होतो.... शुद्ध हवेतून एकदम अशुद्ध हवेत प्रवेश होतो. भिवंडीच्या ट्रक आणि टेम्पो च्या ट्राफीक मधून बाहेर पडत काल्हेर कशेली चा रस्ता पकड़ला. पुढ़च्या 20 मिनिटात ठाण्यामध्ये एका हॉटेल समोर गाड्या उभ्या केल्या....4.30 वाजले होते. हॉटेल मध्ये जेवणाचा  बंदोबस्त होईल का विचारले आणि पोट्भर जेवून घेतले.
लाल टपोरी बोरे 

उसाचा रस 

बुलेट 

वटवृक्ष 


घरापासून घरापर्यंत 128 किमीचे रनिंग केले. बुलेट सफारीचा मस्त आनंद लूटला. कॉंक्रीटच्या रस्त्यापासुन, डांबराचे, मातीचे, दगड़ाचे सगळ्या प्रकारचे रस्ते अनुभवायाला मिळाले. प्रवासचा पूर्ण आनंद घेतला.

Read rest of entry

Sunday, June 30, 2013

येऊर पर्वतरांगा.


हो नाही करत शेवटी अर्ध्या दिवसासाठी का होईना येऊरला जायचे ठरले. माझ्या घरच्या मागेच येऊर च्या डोंगररांगा आहेत. हा भाग संजय गांधी नॅशनल पार्क ह्या राखीव अभयारण्यात येतो. ह्या डोंगररांगा ओलांडून गेलो तर दुसर्‍या बाजूला बोरीवली येते. सगळ्यांना वेळ कमी असल्यामुळे फक्त अर्धा दिवसातच भटकून यायचे ठरले. त्यात वटपौर्णिमा असल्यामुळे ह्या दिवशी बायकोचे प्रेम उतू जात असते. त्यामुळे सर्वांनाच अर्ध्या दिवसात घरी परत यायची धमकीवाजा सूचना मिळाली होती. त्यामुळे येऊर शिवाय पर्याय नव्हता. दुसरीकडे जाणे म्हणजे अर्धा वेळ फक्त प्रवासातच जाणार. म्हणून सर्वानुमते हीच जागा ठरली. 
सकाळी सुजीतच्या कार ने सात वाजता घरातून बाहेर पडलो. सोबत एसएलआर कॅमेरा, ट्राइपॉड आणि कॅमेरा भिजू नये म्हणून एक छत्री आणि खायला ३ पार्ले-जी, गुड डे, पाण्याच्या बोटल वगैरे घेऊन निघालो. कार येऊर गावात अगदी आतपर्यंत जाते. रस्ते बांधणी खूपचचांगली होती. वनखात्याच्या किंवा एअरफोर्स च्या अखत्यारीत येत असल्यामुळे कदाचित रस्त्यांची स्थिती उत्तम होती. येऊर गावाच्या टोकाला जिथे पर्यंत रस्ते आहेत आणि कार जाईल तिथे पर्यंत कार ने गेलो. कार पार्क करून तिथेच असलेल्या एकुलत्या एक टपरी वर एक कडक चहा घेऊन अभयारण्याच्या हद्दीत शिरलो. 

गेटवरच एक वनखात्याची चौकी आहे. तिथल्या अधिकार्‍याने फक्त पेपर वाचंताना एक नजर टाकली आणि परत पेपर वाचायला सुरूवात केली. आम्ही आपापले कॅमेरे काढून पुढे सरसावलो. पाऊस पडल्यामुळे झाडे हिरवीगार दिसत होती. पण पूर्णपणे हिरवळ अजुन पसरली नव्हती. जमिनीतून नवीन अंकुर फुटले होते. कदाचित एक दोन आठवड्यात सगळे हिरवाएगार होऊन जाईल पण सध्यातरी फक्त झाडेच आणि झाडांच्या  खाली असलेली झुडुपेच दिसत होती. हिरवळ नुकतेच बारसे धरायला लागत होती. जंगलातून जाणारी पायवाट बर्‍यापैकी होती. पायवाट धरून चालले असता कुठे भरकटण्याची शक्यता नाही. 

हा भाग जंगलमध्ये मोडत असल्यामुळे आणि आधीचा थोडाफार अनुभव असल्यामुळे मी सर्वाना जीन्स आणि फूल शर्ट घालून यायला सांगितले होते. कारण जंगलातले किडे आणि डास भयंकर चावतात असा आधीचा अनुभव होता. आणि त्याची प्रचीती लगेचच आली. जंगलात शिरून १० मिनिटे पण झाली नसतील . टायगर डास आपापले इन्जेक्शन घेऊन तयारीतच होते. अंग पूर्ण झाकले होते तरी सुद्धा हातचे तळवे आणि चेहरा त्यांच्यासाठी पुरेसा होता. ह्या डासांच्या अंगावर वाघा सारखे पट्टे असतात म्हणून कदाचित ह्यांना टायगर डास म्हणत असावेत. 

मध्ये येणारे छोटेमोठे पाणवठे ओलांडत आम्ही एका थोड्या मोठ्या ओढा वजा ओहोळ जवळ आलो. सकाळ पासून पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याला तसा जोर नव्हता. पण तरी गुडघाभर वाहते पाणी होते. थोडा वेळ बसून आराम केला. पार्ले जी गुडडे खाऊन जरा ताजेतवाने झालो. आता पुढे जायचे की परतायचे ह्या विषयावर चर्चा चालू झाली. तो ओढा ओलांडून १५ मिनिटे चालून गेल्यावर एक धबधबा येतो ते माहीत होते.

लहानपणी एकदा असाच सोसायटीची मुले धबधब्यावर गेलो होतो. आम्ही जाऊन आल्यावर जोरदार पावसाची सर आली आणि ओढा पूर्ण भरून जोरदार वाहू लागला होता. त्यामुळे पलीकडच्या काठावरचे लोक तसेच अडकून पडले होते. पोलिसांपर्यंत बातमी पोचल्यावर ते काठ्या घेऊनच  आले. एक तर त्याना जंगलात फरफटत यावे लागले होते त्यात संध्याकाळाची वेळ होती त्यांना परतताना अंधरातून जावे लागणार होते. त्यामुळे ज्याला भेटेल त्याला मारत सुटले होते.आम्ही सोबत सोसायटीची मोठी माणसे असल्यामुळे त्यावेळेला त्या तडाख्यातून वाचलो होतो. पण पलीकडच्या काठावर अडकलेले लोक तसेच रात्रभर अडकून पडले होते. झाडाला दोरया बांधूनसुद्धा पाण्याच्या जोर जास्त असल्यामुळे त्याना तो ओढा ओलांडता आला नव्हता. दुसर्या दिवशी पाऊस कमी झाल्यावर ते सगळे सुखरूप बाहेर पडले होत. त्यामुळे तो ओढा ओलांडून जाण्याची भीती होतीच. 

पण सकाळ पासून पाऊस पडला नसल्याने आम्ही रिस्क घेण्याचे ठरवले. कॅमरा बॅगेत पॅक करून आम्ही सगळे ओढा ओलांडानारच तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. पण तसा जास्त जोर नव्हता त्यामुळे आम्ही पुढे सरकत राहिलो. पुढे पंधरा मिनिटे चालल्यावर धबधब्याच आवाज येऊ लागला. झाडी बाजूला करत डोंगर खाली उतरताच धबधब्याचे नयनरम्य दृष्य दिसून आले. आमच्या आधी अजुन एक ग्रूप आधीच तिथे येऊन ओली पार्टी करत बसले होते. आम्ही सोयीची जागा बसून विसावलो. मग थोडे फोटो क्‍लिक करून पाण्यात पाय सोडून रिलॅक्स झालो. निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला.मुंबईच्या च्या प्रदूषणातून दूर मोकळा श्वास घेतला. कोणाला अचानक ह्या जंगलात आणून सोडले आणि सांगितले की ह्या जंगलच्या बाहेर १.२० करोड लोक रहातात. तर कोणाला विश्वास नाही बसणार एवढी अप्रतिम शांतता....फक्त धबधब्याचा वाहणे आणि पक्षांचा मंजुळ आवाज.


तिथली निसर्गरम्यता आणि मोकळे वातावरण पाहून तिथून निघायला मन करत नव्हते. पण बायकांची आणि त्यांनी धरलेल्या वटसावित्रीच्या  उपासाची आठवण झाली आणि आम्हास तिथून पाय उचलावे लागले. जेवढा मोकळा श्वास छातीत भरून घेता येईल तेवढा श्वास भरून घेतला.  निसर्गर्सौंदर्य कॅमेरात टिपून घेतले उरलेले डोळ्यात साठवून घेतले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. सुदैवाने ओढ्याचे पाणी तेव्हढेच होते त्यामुळे ओढा ओलांडताना काही अडचण आली नाही. 

येताना मात्र वन खात्याच्या चौकी वर पोलिस होते. त्यांनी विचारले की कुठे फोटो काढायला गेला होतात का? आम्ही... हो!! त्यांनी विचारले वनखात्याची परवानगी आहे का? आम्ही म्हटले... नाही...त्याने आम्हाला एक बोर्ड दाखवला ...जाताना आम्ही त्या बोर्डाच्या खालुनच गेलो होतो पण कोणीच बोर्ड नाही वाचला. मग त्याने घाबरवयचा प्रयत्न केला..असे करू नका....पेनल्टी भरावी लागेल. मनात म्हटले, आता हा पैसे काढायला लावणार. पण त्याने सांगितले की तुम्ही पहिल्यांदाच आलात म्हणून तुम्हाला सोडून देतोय...पुढच्या वेळेला बोरीवली नॅशनल पार्क मधून परवानगी काढून घ्यावी लागेल.... ह्यावेळेला सोडून देतोय.

आम्ही पण मग कशाला मागे वळून पाहतोय...तसेच आभार मानून तिथून सटकलो.










-x-
Read rest of entry

Sunday, June 23, 2013

ओढ सह्याद्रीची!!!

पावसाळा आला की मला सह्याद्रीचे, नद्या खोर्यांचे, गड किल्ल्यांचे, कोकणाचे वेध लागतात. अगदी कॉलेज मध्ये असल्यापासून सह्याद्रीच्या रांगा खुणावत आल्या आहेत. त्यावेळेला वेळ खूप होता पण पैसे कमी असल्यामुळे कुठेहि  पिकनिक काढायच्या आधी दहा वेळा विचार करावा लागायचा आणि आता देवाच्या कृपेने पैसे आहेत पण वेळ नाही आहे. लग्न झाल्यावर आणि मूल झाल्यावर तर डोके खाजवायला पण वेळ नाही. मोठ्या हौसेने हा प्रवास वर्णनावर ब्लॉग चालू केला होता. मागचा ब्लॉग जून २०११ चा आहे आणि आज जून २०१३ आहे.... मध्ये कडक दोन वर्षाचा उपवास....त्यावरूनचं समजत असेल किती वेळ मिळतोय..तसा मध्ये एक लोहगड ट्रेक झाला होता...पण तो लिहायला पण वेळ नाही मिळाला.

दर पावसाळ्यात ठरवतो की ह्या वेळेला कसेही करून एक दोन तरी किल्ले करायचे पण कशात काय नी फाटक्यात पाय. दर वेळेला आपले दुसऱ्यांचे ब्लॉग आणि त्यांनी काढलेले फोटो बघून समाधान मानायचे. मन असे अगदी खायला उठलेय..एक अनामिक ओढ लागलीय सह्याद्रीला भेटायची...त्याला कॅमेरात बंदिस्त करायची...आपला स्वत:चे कोण तरी वाट बघतय आणि त्याला भेटायला मिळत नाही तेव्हा जसा जीव कासावीस होतो तसे अगदी आतमधून होतेय....मन बेचैन होतेय.

मनातून खूप वाटते की दर शनिवारी बॅग पॅक करून पुण्याकडे किंवा नाशिकच्या रस्त्याला निघून जायचे. वाटेत जो काही निसर्ग भेटेल त्याचा आस्वाद घेत गड किल्ले करायचे. अगदी पाय थके पर्यंत चालत राहायचे..ट्रेकिंग करत राहायचे...गरम गरम वाफाळलेला चहा ढोसायाचा...पार्ले-जी ची बिस्किटे खायची आणि फिरत राहायचे....किल्ल्यांच्या पायथ्याशी झुणका भाकर खायची...गारेगार विहिरीचे पाणी प्यायचे...आणि परत पुढच्या प्रवासाला चालत राहायचे...रविवारी संध्याकाळी परतीच्या प्रवासाला लागायचे...मुंबईच्या ट्राफिकला शिव्या घालत...सोमवारी ऑफिस मध्ये दुखलेले पाय घेऊन हजर व्हायचे आणि परत येत्या शनिवारी कुठे फिरायला जायचे ते ठरवत शनिवारची वाट बघत बसायची...

अख्खा पावसाळा हा क्रम चालू ठेवायचा...मुक्त हस्ताने निसर्गाची कलाकृती पाहत आस्वाद घेत राहायचे. नेहमीच्या रुटीन आणि रटाळ आयुष्यात तेव्हढाच विरंगुळा...

ह्या वेळेला सोबत निकॉन D5000 पण आहे...बघू ह्यावेळेला तरी मुहूर्त लागताहेत काय? 

Read rest of entry

Saturday, June 11, 2011

टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती


ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात टिटवाळा नावाचे एक छोटे शहर वजा एक खेडे आहे. एक प्राचीन आणि पुरातन असे सिद्धिविनायक महागणपतीचे मंदिर आहे. ह्या गणपतीला विवाह गणपती असेही म्हणतात. १२ ते १३ एकर वर पसरलेले हे मंदिर कालू नदीच्या तीरावरच वसलेले आहे. ह्या मंदिराचा उल्लेख हजारो वर्षापूर्वीच्या ग्रंथात आणि साहित्यातही सापडतो. मधल्या काळात ह्या स्थळाचे वर्णन कुठेच आढळत नाही थेट माधवराव पेशवांच्या काळात ह्या मंदिराचा उल्लेख येतो.
टिटवाळयाचा सिद्धिविनायक महागणपती 

प्राचीन साहित्यांच्या आधारे हे शहर त्यावेळेला दंडकारण्यात येत होते. (दंडकारण्याचा परिसर काही साहित्याप्रमाणे आत्ताचा पूर्ण (?) महाराष्ट्र (कदाचित कोंकण सोडून) आणि मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, आत्ताचे छत्तीसगड, बिहार ह्या राज्याचा काही भाग. आता बहुतांशी भाग हा नक्षलवादींच्या हाताखाली आहे.) कण्व ऋषी ह्या परिसरात आश्रम बांधून राहत होते. कण्व ऋषीं ऋग्वेद आणि अंगिरस ह्या वेदांचे लेखक मानले जातात. ह्या ऋषींनी शकुंतला नामक मुलीला तिच्या आई वडिलांनी त्याग केल्यावर दत्तक घेतली होती. शकुंतला हि ज्येष्ट ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका ह्यांच्या संबधातून जन्माला आलेली होती. तिच्या जन्मानंतर तिच्या आई वडिलांनी तिच्या त्याग केल्यावर कण्व ऋषींनी तिला दत्तक घेऊन तिचा सांभाळ केला. 

एकदा गांधार देशाचा राजा दुष्यंत लढाईच्या मार्गावर असताना ह्या परिसराच्या बाजूने जात होता. त्यावेळेला त्याने सुंदर शकुंतलेला पहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला. तीच गोष्ट शकुंतलेच्या बाबतीत ही घडली. पुढे त्या दोघानी गंधर्व पद्धतीने विवाह केला. काही काळ एकत्र व्यतीत केल्यावर राजा दुष्यंताला आपल्या राज्यात परतावे लागले. जाताना त्याने आठवण म्हणून आपली राजेशाही खानदानी अंगठी तिला दिली आणि त्याने परत येऊन तिला घेऊन जाण्याचे वचन देऊन तो निघून गेला. काही काळाने एकदा आश्रमात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी अत्यंत तापट स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. शकुंतला दुष्यंताच्या विचारात मग्न असल्यामुळे तिने त्यांचे यथायोग्य स्वागत केले नाही म्हणून त्यांनी रागाने तिला शाप दिला कि तू ज्या आवडत्या व्यक्तीच्या विचारात राहून माझे स्वागत केले नाहीस तोच व्यक्ती तुला तुझ्या आठवणींसकट विसरून जाईल. शकुंतलेने माफी मागितल्यावर त्यांनी दया येऊन तिला उ:शाप हि दिला कि त्याने दिलेले प्रेमाचे प्रतिक त्याला दाखवल्यावर त्याला सर्व आठवेल.
दुष्यंत शकुंतला राजा रवी वर्म्याच्या नजरेतून

दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापानुसार सर्व घडत गेले. राजा दुष्यंताने शकुंतलेला ओळखले नाही व तिचा स्वीकार हि केला नाही. कण्व ऋषींनी शकुंतलेची दशा पाहून तिला विघ्नहर्त्या सिद्धिविनायक गणेशाची स्थापना करून पूजा करायला सांगितली. सिद्धिविनायकची भक्ती केल्यानंतर तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि राजा दुष्यंत तिचा स्वीकार करेल. कण्व ऋषींनी सांगितल्याप्रमाणे तिने सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले आणि गणेशाची भक्ती केली. नंतर काळानुसार दुष्यंताने तिचा स्वीकार केला. दुष्यान्तापासून तिला मुलगा हि झाला. त्याचे नाव भारत ठेवले गेले. महाभारतातील कौरव पांडव हे ह्या भारत राजाचेच वंशज होते. 

पुढे काळाच्या ओघात ते मंदिर पाण्याखाली गेले असावे. कारण मधल्या कुठल्याच काळात त्याचे अस्तित्व सापडत नाही. पेशवांच्या काळात एकदा दुष्काळ पडला असताना त्या दुष्काळावर मात करण्यासाठी पेशव्याचे सरदार रामचंद्र मेहेंदळे ह्यांनी तलावाचे उत्खनन करायला चालू केले असता त्यांना मंदिराचे अवशेष सापडले. पुढे स्वप्नातील दृष्टांतानुसार त्यांना पुढे गणेशाची मूर्ती सापडली. पेशव्यांनी लगेचच मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. पुढे वसईची स्वारी जिंकून आल्यानंतर त्यांनी गणेशाच्या मूर्तीची प्रतिस्थापना केली.१९६५-६६ सालापर्यंत पेशव्यांनी बांधलेल्या मंदिराची पडझड झाली होती. लाकडाचे बांधकाम असलेल्या सभामंड हि छोटा पडू लागला होता. म्हणून १९६५-६६ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला 

पेशव्यांनी ३ एकर जागा देऊन हे मंदिर बांधले होते. नंतर मंदिराचे पारंपारिक पुजारी जोशी ह्यांनी आपल्याकडची १३  एकर जागा देऊन ह्या मंदिराचा विस्तार केला. नुकतेच महापालिकेने तलावाचे बांधकाम करून सारा परिसर सुशोभित केला. 

ह्या गणेशाला विवाह गणपती सुद्धा म्हणतात.विवाह न होणाऱ्यांसाठी आणि विवाह इच्छुक जोडप्यांनी ह्या गणेशाची आराधना केल्यावर त्यांच्या मनासारखा विवाह घडून येतो. तसेच घटस्फोटीत जोडपे हि आपले वाद मिटवण्यासाठी ह्या गणपतीचे दर्शन घेतात. गणपतीची मूर्ती हि हि ३.५ ते ४ फुट उंचीचा ओटा बांधून त्यावर विराजमान झालेली आहे. त्यामुळे सभा मंडपात बसून हि देवाचे चांगले दर्शन होते. सभामंडपाच्या वर असलेल्या गॅलेरी मधून सभामंडपाचे आणि गणेशाच्या मूर्तीचे दर्शन होते. 

सुरक्षेच्या कारणास्तव आता ह्या मूर्तीचे फोटो काढता येत नाही. वर लावलेला मूर्तीचा फोटो हा नेट वरून घेतलेला आहे. ह्या मंदिरात जायला मध्य रेल्वेवरच्या टिटवाळा स्टेशन वर उतरावे लागते. तेथून टांग्याने किंवा ऑटो करून ५ मिनिटात मंदिरात जाता येते. सकाळी लवकर गेल्यास ऑटो न करता आजूबाजूचा निसर्ग पाहत रमत गमत चालत जायचे. चालत २५ ते ३० मिनिटात मंदिरात पोहोचता येते. मंदिरात दर्शन करून अर्धा तास बसायचे आणि मग आरामात परतीला लागायचे.


टिटवाळा गणपती मंदिर


Read rest of entry

Tuesday, May 17, 2011

अलिबागचे जुने वाडे

अलिबाग दरवेळेपेक्षा ह्या वेळेला मला खूप वेगळा वाटला आणि आवडला सुद्धा ते म्हणजे तेथील जुने वाडे आणि देवळांसाठी. ह्या पोस्ट मध्ये फक्त जुन्या वाड्यांचे फोटो टाकत आहे. खरच नशीबवान आहेत ह्या वाड्यात राहणारी माणसे जी अजून ही आपली संस्कृती आणि पारंपारिक निवासस्थाने जपून आहेत. मला अश्या ह्या लाकडांच्या वाड्यांचे, त्यांच्या भग्न अवशेषांचे लहानपणापासून आकर्षण आहे. 

























Read rest of entry
 

About Me

My Photo
Ashish Sawant
View my complete profile

Followers

My Blog List

  • आशा भोसले.....The Last Empress - *आशा भोसले... स्वर-साम्राज्याची शेवटची साम्राज्ञी* लता दीदी गेल्या तेव्हा त्यांच्याबद्दल खूप काही लिहायचे होते, पण शब्द सुचले नाहीत वेळ ही भेटला नव्हता. आज...
    6 months ago
  • Condom !! - Readers are requested to read this post on their onus only. As a author this post doesn’t contain any adult material. Still if readers feels so.... then C...
    14 years ago
  • Condom !! - Readers are requested to read this post on their onus only. As a author this post doesn’t contain any adult material. Still if readers feels so.... then C...
    14 years ago
  • लोकसंख्येचे कारण - एक बातमी “…..महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील दुस-या क्रमांकाचं राज्य ठरलंय. देशातील सर्वाधिक लोकसंख्येच...
    15 years ago

मी इथेही....

Marathi Mandali! Marathi IndiBlogger - The Largest Indian Blogger Community Visit blogadda.com to discover Indian blogs