पावसाळा आला की मला सह्याद्रीचे, नद्या खोर्यांचे, गड किल्ल्यांचे, कोकणाचे वेध लागतात. अगदी कॉलेज मध्ये असल्यापासून सह्याद्रीच्या रांगा खुणावत आल्या आहेत. त्यावेळेला वेळ खूप होता पण पैसे कमी असल्यामुळे कुठेहि पिकनिक काढायच्या आधी दहा वेळा विचार करावा लागायचा आणि आता देवाच्या कृपेने पैसे आहेत पण वेळ नाही आहे. लग्न झाल्यावर आणि मूल झाल्यावर तर डोके खाजवायला पण वेळ नाही. मोठ्या हौसेने हा प्रवास वर्णनावर ब्लॉग चालू केला होता. मागचा ब्लॉग जून २०११ चा आहे आणि आज जून २०१३ आहे.... मध्ये कडक दोन वर्षाचा उपवास....त्यावरूनचं समजत असेल किती वेळ मिळतोय..तसा मध्ये एक लोहगड ट्रेक झाला होता...पण तो लिहायला पण वेळ नाही मिळाला.
दर पावसाळ्यात ठरवतो की ह्या वेळेला कसेही करून एक दोन तरी किल्ले करायचे पण कशात काय नी फाटक्यात पाय. दर वेळेला आपले दुसऱ्यांचे ब्लॉग आणि त्यांनी काढलेले फोटो बघून समाधान मानायचे. मन असे अगदी खायला उठलेय..एक अनामिक ओढ लागलीय सह्याद्रीला भेटायची...त्याला कॅमेरात बंदिस्त करायची...आपला स्वत:चे कोण तरी वाट बघतय आणि त्याला भेटायला मिळत नाही तेव्हा जसा जीव कासावीस होतो तसे अगदी आतमधून होतेय....मन बेचैन होतेय.
मनातून खूप वाटते की दर शनिवारी बॅग पॅक करून पुण्याकडे किंवा नाशिकच्या रस्त्याला निघून जायचे. वाटेत जो काही निसर्ग भेटेल त्याचा आस्वाद घेत गड किल्ले करायचे. अगदी पाय थके पर्यंत चालत राहायचे..ट्रेकिंग करत राहायचे...गरम गरम वाफाळलेला चहा ढोसायाचा...पार्ले-जी ची बिस्किटे खायची आणि फिरत राहायचे....किल्ल्यांच्या पायथ्याशी झुणका भाकर खायची...गारेगार विहिरीचे पाणी प्यायचे...आणि परत पुढच्या प्रवासाला चालत राहायचे...रविवारी संध्याकाळी परतीच्या प्रवासाला लागायचे...मुंबईच्या ट्राफिकला शिव्या घालत...सोमवारी ऑफिस मध्ये दुखलेले पाय घेऊन हजर व्हायचे आणि परत येत्या शनिवारी कुठे फिरायला जायचे ते ठरवत शनिवारची वाट बघत बसायची...
अख्खा पावसाळा हा क्रम चालू ठेवायचा...मुक्त हस्ताने निसर्गाची कलाकृती पाहत आस्वाद घेत राहायचे. नेहमीच्या रुटीन आणि रटाळ आयुष्यात तेव्हढाच विरंगुळा...
ह्या वेळेला सोबत निकॉन D5000 पण आहे...बघू ह्यावेळेला तरी मुहूर्त लागताहेत काय?
0 comments:
Post a Comment
Don't forget to comment...